fbpx

आधीचे ‘बुरे’ दिन जास्त ‘अच्छे’ होते- व्यापारी

narendr modi

टीम महाराष्ट्र देशा – व्यापारात जम बसवल्यानंतर झालं नसेल इतकं नुकसान गेल्या एका वर्षात झालं, अशी खंत दिल्लीतल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, यंदाची दिवाळी ही सर्वात वाईट दिवाळी असल्याचं या व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे ही परिस्थिती ओढावली असल्याची प्रतिक्रिया या व्यापाऱ्यांनी दिली आहे. तसंच, यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवरही गंभीर परिणाम झाल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

या वृत्तानुसार, दिल्लीतील प्रसिद्ध चांदनी चौक येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारात पूर्वी कधीही पाहिली नव्हती, अशी मंदी अनुभवत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, खरेदीचा मोसम असलेला दिवाळसणही यंदा सुनाच गेल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्यावर्षीची नोटाबंदी आणि या वर्षीच्या जीएसटीच्या अंमलबजावणीचा उडालेला बोजवारा यांमुळे अनेक लघु आणि मध्यमस्तरीय व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत. चांदनी चौक येथील मिठाईबाजारातील व्यापार गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० -४० टक्क्यांनी घसरला आहे. मिठाई हा अन्नप्रकार असूनही जर या व्यापाराची ही गत असेल तर, इतर व्यापारांबद्दल विचारही न केलेला बरा, असं मत इथले व्यापारी व्यक्त करत आहेत. या असल्या ‘अच्छे’ दिनांपेक्षा आधीचे ‘बुरे’ दिन जास्त ‘अच्छे’ होते असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे