‘दशक्रिया’ आणि पुरोगामी भूमिका

कुणाल रामटेके – अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा हीअपेक्षा समाजमानातून व्यक्त होते आहे.पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘ऍक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिल्या जाऊन निष्कर्षाप्रत आहे

Loading...

.हजारो वर्ष चालत आलेल्या धर्मजातलिंगभेदात्मक प्रथा-परंपरा केवळ सापेक्ष म्हणूनही चालणार नाहीत. मुळी,ही सामाजिक सापेक्षता नसून विकृती असल्याचे मत नमूद करीत, निरंतर सर्वांगीण शास्वत विकासासाठी सात्यत्यपूर्ण सर्वांगीण चिकित्सा करीत समकालीन उपयोजनशील ‘मॉडेल’ मानवतेने विकसित करावयाचे असते. अर्थातच त्यासाठीचे सकारात्मक वातावरणही समाजानेच विचारवंत, बुद्धिजीवी, विद्यार्थी तथा समाजातील सार्वत्रिक घटकांना उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न करावा हे अपेक्षित असते.

वास्तवतः कोणताही समाज नकारात्मक स्थितिवादातून बाहेर येतांना क्रांती आणि प्रतिक्रांतीची वादळे झेलत पुढे जात असतो.इतकेच नाही तर पुरोगामी समाज जाणिवा जगणाऱ्यांनी त्यासाठी अभिव्यक्तीचे धोके झेलत सामाजिक क्रांतीचे आत्मभान निर्माण करावयाचे असते. कोणत्याही स्वतंत्र्य अशा समाजाच्या उत्थानासाठीची ही पूर्व अट असावी.

दशक्रिया हा चित्रपट सुप्रसिद्ध लेखक,विचारवंत बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित असून त्याचे प्रकाशन १९९४ मध्येच करण्यात आले होते. वाचकांच्या उत्तम प्रतिसादात या कादंबरीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत हे जाणकारांनी लक्षात घ्यावे.

भारतीय सामाजिक वास्तव त्यांनी या कादंबरीतून रेखाटले आहे. आणि दशक्रिया या केवळ विधी पेक्षा त्याअनुषंगाने निर्माण होणारे अपरिहार्य शोषण आणि वंचितांची विवंचनाच त्यात त्यांनी उद्घृत केली. बाबा भांड यांच्या या कादंबरीचा नायक ‘भानुदास’ हा एक छोटा मुलगा असून तो पैठणला गोदावरीच्या घाटावर दशक्रियेचे विधी होतांना पाण्यात सोडल्या जाणाऱ्या राखेतील पैसे वा क्वचितच एखादा सोन्याचा मणी पाण्यात उभं राहून राखेखाली लोखंडी चाळण धरत तर कधी राख पाण्यात पडली, तर थेट पाण्यात बुडी मारुन राख-माती उपसत मोठ्या श्रमाने मिळवतात.

मीही माझ्या बालपणी अशी मुले रामटेक नजीकच्या ‘अंबाला’ तलावावर, वा नाशिकच्या नदीपात्रात अनेकदा बघितली आहेत. त्यावरच त्यांचा निर्वाह चालत असल्याचे त्यांच्या अगतिक बोलण्यातून जाणवले होते. या कादंबरीतील भानुसदासही अशाच मुलांपैकी एक आहे. बाबा भांड यांनी ही सामाजिक सल अधोरेखित केली आहे. बाबा भांड यांची ही कादंबरी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार प्राप्त तथा पाच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असून सहा भाषेतही अनुवादित झाली आहे.

याच कादंबरीवर आधारित दशक्रिया या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले असून दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला २०१७ चा ६४ वा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार लाभला आहे.

मात्र, ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला असून यातून ब्राह्मण समाजाविरुद्ध समाजमनात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. या चित्रपटाला ‘सेन्सॉर बोर्डा’ने परवानगी देऊ नये म्हणूनही महासंघाने प्रयत्न केले होते. मात्र, त्यांची ही मागणी बोर्डाने धुडकावून लावत गेल्या १७ नोव्हेंबर पासून चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीहजारो वर्षांपासून सुरु असलेल्या हिंदू प्रथा परंपरांवर सातत्याने विडंबन होत असल्याचा आरोप करीत ब्राम्हण्यत्व हेच हिंदुत्व असल्याचे म्हटले. या चित्रपटाविरोधातच पैठण येथे ब्राह्मणांनी दशक्रिया विधी न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र यातून माघार घेण्यातच त्यांनी हित समाजाले

dashkriya.

मुळात, स्वातंत्र प्राप्ती नंतर भारतीय घटनाकारांनी स्वातंत्र, समता, न्याय, बंधुत्वाच्या चौकटीवर आधारित भारतीय संविधान निर्माण करून सर्वांगीण विकासाचे ‘मॉडेल’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, “तुमचे संविधान कसे आहे ? त्यापेक्षा ते राबविणारे लोक कसे आहेत हे जास्त महत्वाचे असते.” खरेतर उपयोजनशीलतेच्या प्रश्नांतून सामाजिक सुधारणांचे तत्वज्ञान दुर्लक्षण्याचा प्रयत्न निरंतर केला जातो.अर्थातच त्यात निहित असलेला स्वार्थ लपलेला नसतो.त्याला देण्यात येणारा अस्मितेचा मुलामा वरपांगीच बिनबुडाचा असल्याने सुधारकांनी सामाजिक रुग्णता नष्ट करण्यासाठी निरंतर वैचारिक शस्त्रक्रिया करणे महत्वाचे ठरते. प्रस्तुत दशक्रिया चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादातून पुन्हा एकदा सामाजिक अभिसरण होत उपयोजनाचे नवनीत निर्मावे ही अपेक्षा असतांनाच मीडियाद्वारा देण्यात येणारा टीआरपी चा रंग मात्र निश्चितच घातक ठरेल.

मुळात, मरणोपरांत विधीकडे विविध धर्मश्रध्दांचा अपरिहार्य भाग म्हणून बघितल्या जाते.मृतात्म्याच्या शांतीसाठी दशक्रिया हा विधी हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येतो. व्यक्तीच्या निधनानंतर अग्निदाह,अस्थिसंचयन आदी दहा दिवसापर्यंतच्या विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. यात अगदी स्नान, पिंडदान,श्राद्ध, कावळा शिवणे, ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांना दान अशा अनेकविध विधींचा समावेश होतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार मृत्योपरांत दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा पूर्ण न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही असा विश्वास आहे. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडालाकावळा शिवल्यास मुक्ति मिळते,कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा करून पिंडाला स्पर्श करून ‘कावळा शिवला’ असे मानतात.

या संदर्भात एक आख्यायिकाही मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. त्यानुसार,एकदा राम वनवासात झोपले असतांना तेथे एक कावळा येऊन सीतेला त्रास देतो. त्रासून सीता रामाला उठवते आणि कावळ्याबद्दल रामाकडे तक्रार करते. रामाकडे त्यावेळी धनुष्यबाण नसतो, म्हणून जवळच पडलेली एक गवताची काडी मंत्रोच्चार करून कावळ्यावर फेकतो. ती काडी अर्थात मंत्रीत दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेते. एका डोळ्याने अंध झालेल्या कावळ्याला म्हणूनच ‘एकाक्ष’ म्हणत असल्याचे बोलले जाते. यावेळी सीता कावळ्याला ‘तू एकाक्ष असल्याने तुला सर्वजण अशुभ मानतील,’ असा शाप देते. अर्थातच कोणत्याही काल्पनिक कथेत होत असल्याप्रमाणे येथेही कावळा सीतेला उःशाप मागतो. त्याची दया येऊन सीता त्याला ‘मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही, शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल’ असे सांगते. दशक्रीयेच्या संदर्भात ही आख्यायिका परंपरेने सांगितली जाते.

मुळात, धर्मशास्त्राने दिलेल्या अधिकारानुसार कोणत्याही धर्मकार्याचा अधिकार हा ब्राह्मणांनाच आहे.अर्थातच या धर्मविधीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या वर्गाचा एकाधिकार राहीला आहे. दशक्रिया विधी ही मरणोपरांत क्रियाविधी असल्याने ही स्मशानकर्म करणारा वेगळा वर्ग निर्माण झाला. कथित अशुभ कर्म करणाऱ्या या पुरोहितास ‘किरवंत’ म्हटल्या जाते.किरवंत हा ‘क्रियावंत’ या शब्दाचा कोकणी अपभ्रंश आहे. असो. मात्र, ब्राह्मण वर्ग या जातीस कायस्थांप्रमाणेच ब्राम्हण समाजत नाहीत. ही वास्तविकता येथे नमूद करावीशी वाटते.

या विषयावर प्रेमानंद गज्वी यांनी १९८१ साली ‘किरवंत’ नावाचे एक नाटकही लिहिले. पिंडाला कावळा शिवला नाही तर थेट दर्भाचा कावळा करून पिंडस्पर्श घडवून आणला जातो. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे ‘किरवंत’. हा विधी संपल्यानंतर मात्र हाच ब्राह्मण अस्पृश्य समजल्या जातो. हीच व्यथा ‘किरवंत’ या नाटकाच्या माध्यमातून गज्वी मांडतात. ब्राह्मण समाजात ‘किरवंत’ हा उतरंडीच्या शेवटचा घटक असल्याने इतर समुदाय त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करीत नाही. भारतीय उतरंडीच्या जात वास्तवात एक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ समजण्यात येते. अर्थातच या जातीय शोषण व्यवस्थेला देण्यात येणारा धर्मतत्वज्ञानाचा आधार अत्याधिक घातक ठरला असून भारतीय परीपेक्षात जातीवर्गलिंगभेदवादी व्यवस्थेविरोधातील पुरोगामित्वाचा लढा या विरुद्धच आहे.

मुळात, चिकित्सा हा भारतीय प्रवाद परंपरांचा अंगभूत घटक मानावयास हरकत नसावी. अर्थातच हे भारतीयत्व म्हणजे हिंदुत्व नाही, हे ओघानेच आले.अगदी आस्तिक मुनी महर्षी चार्वाकांपासून ते अकराव्या शतकातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तथा शाहू, फुले आंबेडकरी सामाजिक क्रांतिकारी परंपरा आणि अलीकडच्या काळात संत गाडगे महाराजांपर्यंत हा प्रबोधनाचा वारसा भारतीय समाजाने जोपासला आहे.अर्थातच प्रतिक्रांतिवादी मंडळींनी सातत्याने केलेल्या विरोधातून सावरत हे सामाजिक क्रांतीचे मूल्यभान इथवर आले आहे. ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या रूपाने निर्माण झालेल्या वादातून निश्चितच सामाजिक क्रांती ही एका दिवसीय प्रक्रिया नसून ती निरंतराची गरज आहे हे पुनश्च उद्घृत करणे महत्वाचे ठरते.

मुळात, समकालीन वादाची उपयोजनशीलता केव्हाचीच नष्ट झाली असून त्याबाबतचे सामाजिक अभिसरणही केव्हाच पूर्ण झाले आहे. अकराव्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या अनुयायांना कोणत्याही तथाकथित धर्मअंधश्रद्धांपासून दूर राहण्याचे सुचवतात.धर्मोल्लेखित स्वर्ग आणि मोक्षाच्या पलीकडे जात त्यांनी धर्मावरील काहींची ‘मोनोपॉली’ मोडून काढली आहे.भारतीय धर्म परंपरा जेथे तथाकथित स्वर्गीय सुखाच्या स्वार्थाने प्रेरित होऊन निरर्थकात गुंतून सामाजिक देय्य जाणिवांपासून अलिप्त होऊन धार्मिक, सामाजिक गुलामगिरीत बंधीस्थ होऊ बघतात, त्याच वेळी चक्रधर मात्र “स्वातंत्र्य हाच मोक्ष, पारतंत्र्य हाच नर्क” असल्याचे निक्षून सांगत तथाकथित धर्मश्रद्धेला छेद देत नवसमाज निर्मितीसाठी नव्या माणसाला साद घालतात.मृत्यूनंतरच्या जीवनापेक्षा “मनुष्यमात्र होवोनी असावे” चक्रधरांचे हे विचार आजही प्रासंगिक ठरावेत.

हेच पुरोगामी विचार संत गाडगे महाराज जनसामान्यांच्या भाषेत मांडतात. बाबा काशीला गेल्या नंतर तेथील ब्राह्मणाला करत असलेले पिंडदान,अर्ध्यदान बघून स्वतः ही जोरजोरात नदीचे पाणी फेकायला लागतात त्यांच्या या कृतीने विचलित होत शिवराळ भाषेत चिंध्या पांघरलेल्या गाडगे बाबांना ब्राह्मण त्याचे कारण विचारतो. बाबा आपल्या नेहमीच्याच भाषेत त्याला दूर महाराष्ट्रात असलेल्या आपल्या शेताला पाणी देत असल्याचे सांगतात.अर्थातच त्यांच्या बोलण्याला त्या ब्राम्हणाने मूर्खात्वाचे शिक्कामोर्तब करत महाराजांच्या या कृतीवर भौतिकतेचे प्रश्नांकन केले. त्यावर उत्तर देतांना महाराजांचे शब्द या दशक्रियेच्या निमिताने मोलाचे ठरतात. बाबा म्हणतात, ‘स्वर्ग कोठे आहे ते माहीत नसतांनाही तुम्ही केलेले पिंडदान, अर्ध्यदान हे जर अचूक पितरांना पोहचते तर माझ्या शेताला हे पाणी का बरे पोहचू शकणार नाही ?महाराजांचा त्या ब्राह्मणाला पचनी न पडलेला हा प्रश्न आजही उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. खरे तर, समकालीन वाद संदर्भ लक्षात घेता ‘दशक्रिया’ हा काही आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा नसावा. मात्र प्रतिक्रांतिवादी प्रवृत्तीच्या अतिरेकातून उद्भवणाऱ्या सामाजिक अस्थिरतेच्या वातावरणात आणि कायदा व सुरक्षिततेच्या प्रश्नाच्या संदर्भात व्यवस्थेने ठोस भूमिका बजावने महत्वाचे ठरते.Loading…


Loading…

Loading...