कुर्डूवाडी बाजार समितीमध्ये गैरव्यवहार; संजय शिंदे यांच्या अडचणीत वाढ

करमाळा – माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गैरव्यवहार झाल्याचे भाजपचे माढा तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी उघड केले असल्यामुळे करमाळा बाजार समिती निवडणूकीत जि प अध्यक्ष संजय शिंदे अडचणीत आलेले आहेत.

करमाळा  विधानसभेत आमदार होण्याची आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ताबा घेण्याची स्वप्न संजय शिंदे पाहत आहेत. मात्र त्यांच्या स्वप्नांना या आरोपांमूळे सुरुंग लागू शकतो. कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विना परवाना बांधलेल्या गाळ्यांचे लाखो रूपयांना विक्री करून गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार कोकाटे यांनी केली होती. याशिवाय अनेक प्रकारे या संस्थेत भ्रष्टचार झाल्याचे कोकाटे यांनी म्हटले होते.  त्यांनी  केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे अप्पर लेखापरिक्षक वर्ग १ चे  व्ही. एन पाखले दुजोरा आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची आता चौकशी होणार आहे.