स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेसवर बिनबुडाचे आरोप – रमेश बागवे

ramesh bagve

टीम महाराष्ट्र देशा-: केंद्रातील मोदी सरकारने ज्या हेतुसाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला तो साकार झालेला नाही. या नोटा बंदीच्या चूकीच्या निर्णया विरोधात कॉंग्रेस पक्ष ८ नोव्हेंबरला जनआक्रोश दिन म्हणून साजरा करणार आहे. आपले अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पक्ष कॉंग्रेस पक्षावर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे आरोप कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी केला.   केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर व भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्ष काळ्या पैशांचे समर्थन करीत आहे असा आरोप केला. कॉंग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी अश्‍या प्रकारचे आरोप भारतीय जनता पक्ष करीत आहे, असे बागवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.   गेल्या वर्षी जावडेकर व योगेश गोगावले यांनी नोटा बंदीच्या समर्थनास एस.पी. महाविद्यालयात एक सभा आयोजित केली होती. या सभेसाठी काही महाविद्यालयांवर दबाव टाकून विद्यार्थ्यांना त्या सभेस उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली होती.

त्या सभेमध्ये डिजीटल इंडियाच्या बद्दल जावडेकरांनी माहिती दिली व घोषणा केली होती की, फर्ग्युसन कॉलेज रोड व जंगली महाराज रोड रस्त्यावरील व्यापाऱ्यांना स्वाईप मशिन उपलब्ध करून देऊन त्यांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी मदत करणार असे सांगितले होते त्याचे काय झाले? या भागातील व्यापाऱ्यांना स्वाईप मशिन उपलब्ध करून दिली आहे का? त्याची माहिती पुणेकरांना द्यावी.   भाजपचे स्वदेशी वस्तू विकत घेण्याबाबत शहरात प्रदर्शन चालू आहे. त्यात कॅशलेस व्यवहार झाला आहे का? तेथे स्वाईप मशिनचा वापर झाला आहे का? नोटाबंदीमुळे काळा पैसा किती जमा झाला व त्याचे फलित काय? याचे उत्तर प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले पाहिजे.

पंतप्रधान काळ्या पैशांच्या बाबतीत गुजरातमध्ये माहिती देतात परंतु संसदेत माहिती का देत नाहीत? प्रगतीशिल देश अमेरिका, जर्मनी व इंग्लडमध्ये ४०% अर्थव्यवहार रोखीने होतात. भारतात विशेषत: ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर यांचे व्यवहार रोखीनेच होतात. नोटा बंदीमुळे देशाच्या जनतेला त्रास भोगावा लागला आहे. सव्वाशेच्या वर लोक बँकेच्या रांगेत उभे राहून मृत्यूमुखी पडले. नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेला शेतकऱ्याला या नोटाबंदीचा अधिक त्रास सोसावा लागला. या नोटाबंदीच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार काळा पैसा विरोधी दिन साजरा करीत असल्याचेही बागवे यांनी म्हटले आहे.