प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे स्मारक उभारणार – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा –  ज्यांनी केलेली कामे हजारो वर्षे लक्षात आठवणीत राहण्यासारखी असतात त्या व्यक्तींची स्मारके उभारली जातात. लहुजी साळवे यांचे काम तर लाखो वर्षे लक्षात राहण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे स्मारक या ठिकाणी निर्माण केले जाईल.

त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारतर्फे दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केली. आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या 223 व्या जयंतीनिमित्त संगमवाडी येथील आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाला भेट देत अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, लहुजी साळवे यांचे स्वातंत्रलढ्यातील योगदान खूप मोठे आहे,

कारण त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्यांनी पुढे स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या जीवनावर एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या चित्रपटात त्यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असेल.

हा चित्रपट देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु लहुजी साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले.

मुख्यमंत्र्यांनीही यावेळी बोलताना या स्मारकाला भेट देण्यासाठी मलाही उशीर झाल्याचे सांगत महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाला भेट दिलीच पाहिजे असे सांगितले.यावेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे,भीमराव तापकीर आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...