बिग बी अपघातातून बचावले

amitab

टीम महाराष्ट्र देशा – बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची वृत्त समोर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

शुक्रवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन आले होते. शनिवारी त्यांना BMW कारने विमानतळावर नेलं जात होतं. यावेळी एअरपोर्टला जाताना एजेसी बोस उड्डाणपुलाजवळ रेड रोडवर अचानक त्यांच्या कारचं चाक निघाल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली होती.

दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ बच्चन गाडीतून खाली उतरले व त्यांना रस्त्यावर उभं राहावं लागलं. दुसरीकडे, पश्चिम बंगालचे पंचायत मंत्री सुब्रता मुखर्जी यांची कारही याच ताफ्यात होती. बच्चन यांना रस्त्यावर उभं पाहून मुखर्जींनी गाडी थांबवली आणि बिग बींना त्यांच्या गाडीत बसवले.