साता-यात भाजपच्या कार्यक्रमाला भगवे कारपेट व मांसाहार विभाग

BJP-580x395

टीम महाराष्ट्र देशा –   कट्टर हिंदूत्ववादी व शाकाहाराचा पुरस्कार करणा-या भारतीय जनता पक्षाच्या सातायातील कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी चक्क भगवे कारपेट अंथरल्यामुळे कट्टर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, जेवणासाठी खास मांसाहार विभाग निर्माण करुन भाजपच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन साता-यात झाल्याची टीका आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्ते करु लागले आहेत.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची वीट उभी केली. या सातारच्या सुपूत्राचा कायम गौरव व्हावा, म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाशेजारी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले. दोन दिवसांपूर्वी स्व. चव्हाण यांचे मानसपूत्र शरद पवार व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत या सभागृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर या सभागृहात रात्री एका भाजप पदाधिका-याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करुन भाजपने उद्घाटन केल्याची चर्चा होत असतानाच या ठिकाणी भाजपने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार केले जाणार असून याठिकाणी येणा-या भाजप कार्यकर्त्यांना गुरुवार हा दत्ताचा वार असतानाही मांसाहार विभाग तैनात केला असून सुमारे 50 ते 60 किलो कोंबडी-बक-याचे मटण यासाठी कामी आले आहे.

सकाळी सात वाजल्यापासून या परिसरात मटणाच्या रश्याचा घमघमाट सुटल्यामुळे स्व. चव्हाण साहेबांच्या सभागृहात आता आणखी काय काय पहावे लागणार? असा प्रश्‍न सर्वसामान्य स्व. चव्हाणसाहेबप्रेमींना पडला आहे. एका बाजूला भाजपच्या एका पदाधिका-याने जिल्हा परिषदेच्या सभागृहात वाढदिवस साजरा केला म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, पालकमंत्री व माजी मुख्यमंत्री यांनी संताप व्यक्त केला आहे. पण राष्ट्रवादीच्या कार्यालयात मात्र राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुपूत्राच्या वाढदिवसाला असाच जल्लोश करुन केक कापण्यात आला, याबाबत मौन धारण का केले जाते? असा प्रतिप्रश्‍न भाजप समर्थक विचारु लागले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा देणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यामध्ये कोणी राजकारण आणू नये, अशी विनंती वरिष्ठ नेते करु लागले आहेत.

दरम्यान स्व. चव्हाण सभागृहात झालेल्या वाढदिवसाबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी अद्यापही याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकार्‍यांनी कोणतीही हालचाल केलेली नाही. जिल्हा परिषद सभागृहात भाजपचे दीपक पवार, मनोज घोरपडे, यांच्यासह पाच सदस्य आहेत. त्यांची आक्रमकता सभागृहाने अनुभवली आहे. त्यामुळे याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.Loading…
Loading...