सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीकडे आर.आर आबांनी दुर्लक्ष केल्याचा श्याम मानवांचा आरोप

SHAM MANAV

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष दिले म्हणून एटीएसने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी शिफारस केली, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिली. ते चंद्रपुरात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

“सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती विरोधकांना संपविण्यासाठी काय करु शकतात, याची माहिती आपण 2008 मध्ये आर. आर. पाटलांना दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण शरद पवारांना याची माहिती दिली. त्यानंतर ATS ने फाईल तयार करुन या संस्थांवर बंदी घालण्याची शिफारस केली.” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली.

“2008 मध्ये शरद पवारांना आपण पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समिती हे लोक विरोधकांना विष देऊन मारतील, एड्सचे इंजेक्शन देऊन मारतील, बंदुकीने मारतील अशी पूर्ण यादी दिली होती. याआधी हीच माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही दिली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शरद पवारांनी लक्ष दिल्यावर ATS ने फाईल तयार केली आणि बंदी ची शिफारस केली. तेव्हा पासून ATS चे अधिकारी सनातन-हिंदू जनजागरणच्या सदस्यांकडे चहा पीत नाही.” अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मूळ पत्र पवारांच्या नावाने असल्यामुळे ते लीक करत नाही. कारण शरद पवारसारख्या माणसाने पुढे केलं काय, असा प्रश्न निर्माण होईल अशीही भूमिका त्यांनी मांडली.

“आघाडी सरकारच्या काळात संमत झालेला ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायदा व अंमलबजावणी’ यांचे जनजागृती कार्य त्याच काळात वेगाने झाले. मात्र देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून यातील एकही पैसा मिळाला नसून जनजागृती आणि पोलिसांच्या प्रशिक्षणाचे काम ठप्प झाले आहे.” अशी खंतही श्याम मानव यांनी व्यक्त केली. श्याम मानव हे राज्य सरकारच्या ‘जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समिती’चे सहअध्यक्ष आहेत.Loading…
Loading...