भारतीय विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच अॅपल कंपनीत नोकरी करण्याची संधी

apple

टीम महाराष्ट्र देशा – अॅपल कंपनीत नोकरी करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अॅपलकडून लवकरच हैदराबाद आयआयटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची प्रक्रिया पार पडेल. त्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील. भारतातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये परदेशी कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेणे, ही नवीन बाब नाही. मात्र, अॅपल कॅम्पस प्लेसमेंटसाठी पहिल्यांदाच भारतात येत आहे. त्यामुळे अॅपलला कर्मचाऱ्यांकडून नक्की कशाप्रकारच्या अपेक्षा आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना फारशी कल्पना नाही. तरीही अॅपलसारखी कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी भारतात येणे, ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत आयआयटी हैदराबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता सिद्ध करण्याची ही चांगली संधी असेल. त्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यायला हवा. याशिवाय गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फिलिप्स यांसारख्या नामांकित कंपन्यांनीही कॅम्पस प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. आयआयटीच्या बंगळुरु आणि हैदराबाद येथील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे. या प्लेसमेंटसाठी आतापर्यंत जवळपास ३५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील प्रत्यक्ष किती जणांना नोकरी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. या कंपन्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.