‘पीएमपी’ला लाभल्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

nayna gunde and tukaram munde

पुणे : राज्य शासनाने मागील आठवड्यात तुकाराम मुंढे यांचा नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली केली. त्यांच्याजागी नयना गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीनंतर सोमवारी नयना गुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्या ‘पीएमपी’च्या पहिल्या महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ठरल्या आहेत.

मुंढेच्या कार्यप्रणालीवर होत्या कामगार संघटना नाराज
मागील दहा महिन्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) शिस्त लावणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. तसेच शेकडो कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कामगार संघटनांच्या रोषाचा सामना मुंढे यांना करावा लागला होता. मुंढे यांच्याकडून पुणेकरांना अपेक्षा होत्या. त्यानुसार त्यांनी कामाला सुरूवातही केली होती. मात्र, त्यांना केवळ दहा महिन्यांचा कालावधी मिळाला.

नयना गुंडे यांच्यापुढील आव्हाने
यापुर्वी गुंडे या वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. गुंडे यांनी दुपारी ‘पीएमपी’ची सूत्रे हाती घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘पीएमपी’चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुंडे यांनी अधिकाऱ्यांकडून कामकाजाविषयी माहिती घेतली.

 

  • तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रयत्न केले जाणार आहेत . अनेक कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे. बदल्यांच्या मुद्यावरही प्रचंड नाराजी आहे.
  •  पास दरामध्ये बदल करणे, पंचिंग पास बंद करणे अशा काही निर्णय बदल्याण्यासाठी प्रवासी संघटनाही प्रयत्नशील आहे. त्यामुळे गुंडे यांच्यावर मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय बदलण्यासाठी दबाव असणार आहे.
  • मुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी विविध निर्णय घेतले. आस्थापना आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यावरही कर्मचारी संघटना नाराज आहेत.
  • ‘पीएमपी’ची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आराखडा तयार झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर असेल.
  • प्रवाशांना आवश्यक सोयी-सुविधा, ब्रेकडाऊनचे प्रमाण, नवीन बसेस, बीआरटी, आयटीएमएस यंत्रणा, बसेसची देखभाल-दुरूस्ती, दोन्ही महापालिकांशी समन्वय, निधी मिळविणे, तोटा कमी करणे अशा विविध आघाड्यांवर गुंडे यांना काम करावे लागणार आहे.

1 Comment

Click here to post a comment