fbpx

९ हजार पुणेकरांचा पीएमपी बस पास दरवाढीला विरोध

pmpl

टीम महाराष्ट्र देशा –  कोणतीही घोषणा न करता तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी न घेता अचानक सर्वच बस पासेसमध्ये बेकायदा आणि अन्यायकारक दरवाढ करण्यात आली. बस पासेसमध्ये दरवाढ करूनदेखील प्रवाशांना निकृष्ट सेवाच मिळत आहे. या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहीम राबवली.

पुण्यातील विविध बसस्थानकांवर झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत तब्बल साडे आठ हजार नागरिक सहभागी झाले होते.पीएमपी प्रवासी मंचातर्फे म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात आयोजित प्रवासी मेळाव्यात विविध संघटनांनी राबवलेल्या सह्यांचे निवेदन मंचाकडे सुपूर्द करण्यात आले. महापालिका बसस्थानक, कात्रज बसस्थानक, हडपसर, शिवाजीनगर, सिमला ऑफिस, कर्वे रस्ता तसेच पुण्यातील विविध बसस्थानकावर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मोलकरणी, चाकरमानी यासोबतच अंध, अपंग प्रवाशांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. विवेक वेलणकर म्हणाले, बस पास दरवाढीविरोधात सत्ताधाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे दुटप्पी धोरण दिसून येते. राज्यकर्ते केवळ आश्वासन देतात. परंतु, त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. एकाच पक्षाचे प्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे पीएमपीबाबत कोणताही निर्णय घेताना एकतर्फी निर्णय घेतला जातो. केवळ तुकाराम मुंढेच दोषी नाहीत तर, संचालक मंडळदेखील तितकेच जबाबदार आहे, असेही त्यांनी सांगितले. ही स्वाक्षरी मोहीम गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत ही मोहीम सुरु असणार आहे.