संजय निरुपम यांच्या विरोधात उच्च न्यायालयात २५ कोटींचा दावा

टीम महाराष्ट्र देशा –  आरेतील २० एकर जमिन हडप करुन व्यायामशाळा बांधल्याप्रकरणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपातून लोकायुक्तांकडून क्लिनचिट मिळाल्यानंतर जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी निरुपम यांच्या विरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

मागील वर्षी निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन वायकर यांनी आरेमध्ये २० एकर जमिन हडप केल्याचा तसेच तेथे एक मजली अनधिकृत व्यायामशाळा बांधल्याचा तसेच त्यात ४० रुम उभारल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर ज्या ट्रस्टकडे या व्यायामशाळेच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ती ट्रस्टही नोंदणीकृत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

bagdure

त्यानुसार निरुपम यांनी लोकायुक्त यांच्याकडे यासंदर्भात तक्रारही दाखल केली होती. या आरोपानंतर लगेचच वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप बिनबुडाचे आहेत. आपल्यावर खोटे आरोप करुन आपल्याला नाहक बदनाम करण्याचा निरुपम यांचा डाव असल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले होते. याप्रश्‍नी निरुपम यांनी जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

परंतु लोकायुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरू असल्याने वायकर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला नव्हता. निरुपम यांनी वायकरांवर केलेल्या आरोपांची कागदपत्रेही लोकायुक्तांना सादर केली होती. निरुपम यांनी केलेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर तसेच दोन्ही पक्ष, म्हाडा तसेच आरे प्रशासनाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे ऐकल्यानंतर लोकायुक्तांनी रविंद्र वायकर यांना या प्रकरणातून क्लिनचिट दिली. त्यानंतर वायकर यांनी निरुपम यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. निरुपम यांनी राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप करुन आपल्याला मानसिक त्रास दिला आहे, असा दावा वायकर यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...