झुंजार बांगलादेशविरुद्ध विजयाचे आफ्रिकेचे पहिले ध्येय!

टीम महाराष्ट्र देशा- विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत यजमान इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने मिळालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघ रविवारी येथे दुसऱ्या लढतीत बांगलादेशविरुद्ध विजय मिळवण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी स्पर्धेची ही दुसरी लढत आहे तर बांगलादेश संघ या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडकडून १०४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. काहीशा गोंधळात टाकणाऱ्या ओव्हलच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ८ बाद ३११ धावांवर रोखले होते. मात्र जोफ्रा आर्चरच्या वेग आणि उसळीसमोर दक्षिण आफ्रिकेची २०७ धावांवर दाणादाण उडाली होती.

या पराभवाने गोंधळून न जाता पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने सहकाऱ्यांना केले आहे. या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघाला किमान नऊ लढती खेळायच्या आहेत. स्पर्धा दीर्घकाळ चालणार असल्याने पहिल्याच लढतीत गोंधळून जाण्याचे कारण नसल्याचे फाफ डुप्लेसिसने सांगितले.