fbpx

विखेंनी केला राजशिष्टाचाराचा भंग तरी कट्टर विरोधकांच तोंड गप्पच

टीम महाराष्ट्र देशा : नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळ फासला. नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांची बैठक घेतली. अहमदनगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी संबंधित बैठक घेतली. शालिनी विखे या सुजय यांच्या मातोश्री आहेत.

सुजय यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून बैठक घेतल्याने सभापती आणि अधिकारी नाराज झाले होते. दरम्यान, डॉ. विखे जिल्हा परिषद अध्यक्षांचे सुपूत्र असले तरी राजशिष्टाचाराचे पालन व्हायला हवे, असं उपस्थित सगळ्यांमध्ये चर्चा होती. मात्र, या बैठकीला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, गडाखप्रणीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सुनील गडाख, तसेच इतरही सदस्य उपस्थित होते. पण या बैठकीत त्यांनी याबद्दल ब्र शब्दही काढला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, खा.विखेंनी राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली आहे. काहींच्या मते खासदारांना अधिकार आहे. ते बैठक घेऊ शकतात, तसेच ते अध्यक्षांच्या खुर्चीवर देखील बसू शकतात. अनेक बैठका या खासदारांच्या अध्यक्षतेखाली होतात. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष हे सदस्य म्हणून बैठकीला बसतात. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मते खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष हे दोन्ही लोकप्रतिनिधी वेगळे असल्याने एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे. त्यानुसार राजशिष्टाचार पाळला जाणे आवश्यक आहे.