प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी : अनिल बोंडे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘एकात्मिक शेतकरी कल्याण योजना’ राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा परिसरातील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या ए.पी. शिंदे सभागृहात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या कृषिमंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. बोंडे बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी , कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी राज्यांच्या कृषिमंत्र्यांच्या विशेष सत्राचे समन्वयन केले. महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या सत्रात विचार मांडले. डॉ. बोंडे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देताना, राज्यात 151 तालुके,268 महसूल मंडळ आणि 2 हजार गावांमध्ये दुष्काळ असल्याचे सांगितले. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेअंतर्गत विमा काढला आहे.

मात्र, या योजनेअंतर्गत उंबरठा उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती बघता शेतकऱ्यांचे उंबरठा उत्पन्नाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही अट पूर्ण होत नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यातच महसूल विभागाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी झाली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी यावेळी केली. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेला’ राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यात 91 लाख शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली असून 49 लाख शेतकऱ्यांना यावर्षी या योजनेंतर्गत लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.Loading…
Loading...