fbpx

भारतीय क्रिकेटमधील युवराज पर्वाचा आज होणार अस्त

टीम महाराष्ट्र देशा : टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू आणि सिक्सर किंग युवराज सिंग आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत युवराज सिंग ने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेत युवराज निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही वार्ता युवराजच्या चाहत्यांसाठी नक्कीच निराश करणारी आहे.

युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आठवड्यापूर्वीच आलं होतं.त्यामुळे आज घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये युवराज निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी युवराज सिंग हा भारतीय संघातून बाहेर आहे. फिटनेस आणि कर्करोगामुळे युवराजला भारताच्या अंतरराष्ट्रीय संघातून बाहेर जावे लागले. मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर युवराजने पुन्हा एकदा भारतीय संघात कम बॅक केले होते.

सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार युवराज सिंग हा जगभरात प्रसिद्ध असलेल्या टी २० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडू निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे युवराज सिंगने जर परदेशी टी २० लीगमध्ये सहभागी होण्याची तयारी केली असेल, तर त्याला भारतात निवृत्ती जाहीर करावी लागेल.

दरम्यान युवराज सिंगने भारताकडून ३०४  वन डे सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतकं आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने ४० कसोटी सामन्यात १९०० धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी २० स्पेशालिस्ट युवराजने ५८ सामन्यात ८ अर्धशतकांसह ११७७ धावा केल्या आहेत.