भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी लोणीकरांचे गुढघ्याला बाशिंग

Babanrao-Lonikar

टीम महाराष्ट्र देशा :  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीयमंत्री मंडळात वर्णी लागल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष पद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र याचदरम्यान, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षानं जर जबाबदारी दिली तर मी स्वीकारेल. असे वक्तव्य लोणीकर यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

जालन्याचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेताच नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरु झाला आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नेते स्पर्धेत असताना, बबनराव लोणीकर यांचे नाव अघाडीवर आहे. त्यातचं मला प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यास मी चांगलं काम करेन. असा अशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे.

तसेच याआधी पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार आहे. असे वक्तव्य मुंडे यांनी केले होते. आणि आता लोणीकर यांनी व्यक्त केलेली इच्छा यावरून आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.