भाजप – शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा – धनंजय मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा: पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे.

दरम्यान, पीक विम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच ‘इशारा मोर्चा’ काढत आहे. भाजपा, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात. अरे काय लावलंय यांनी, म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.

विधानसभेच्या निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झालाय

कॉंग्रेसकडून देखील शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करण्यात आली असून शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीत असताना शेतकऱ्याची आठवण येत नाही, मात्र विधानसभेच्या निवडणुका येताच शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर जागा येते. महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवताना यांना लाज कशी वाटत नाही? असा घणाघात कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा वाघ स्वाभिमानी नसून अतिशय लाचार आहे. अशी टीकाही करण्यात आली आहे.

ज्याचं अन्न खातोय त्याला जागतोय, मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक

ज्याचं अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पहाव. मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेकडून पिक विमा कंपन्यां विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ठाकरे बोलत होते.

मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना बांधील आहे, विमा कंपन्यांनी येत्या पंधरा दिवसांचे पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, बँकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, पुढील पंधरा दिवसांत बँकांनी सर्व कर्जमाफीची प्रकरणे निकाली काढावी, तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकामध्ये लावावी, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.