‘सबका साथ, सबका विकास’ मुख्यमंत्री करत नाही; उत्तरप्रदेशातील भाजप खासदाराची टीका

मुंबई – महाराष्ट्र सरकारने अलिकडेच महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. या नियुक्त्यांवरून उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार रामचरित्र निशाद यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास याचे अनुकरण मुख्यमंत्री करत नसल्याच्चे निशाद यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने महामंडळावरील ज्या नियुक्त्या जाहीर केल्या, त्या नियुक्त्यांमध्ये भाजपच्या उत्तर भारतीय नेत्यांकडे कानाडोळा करण्यात आल्याने निशाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशचे रहिवासी असणाऱ्या मुंबईतील भाजप नेत्यांकडे फडणवीस यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. आपल्याच पक्षाच्या नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर उत्तरप्रदेशात मूळ असणाऱ्या मतदारांना आम्ही कसे काय सामोरे जाऊ शकू, असा सवाल निशाद यांनी केला.

संबंधित मुद्दा मी फडणवीस यांच्याकडे उपस्थित करणार आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी चांगले कार्य केले आहे. उत्तरप्रदेशचे रहिवासी असणाऱ्या स्वपक्षातील कार्यकर्त्यांसाठीही त्यांनी असेच कार्य करण्याची गरज आहे. तसेच मुंबईतील बऱ्याच मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरतात.असेही निशाद यांनी सांगितले.