काळ्या पैश्यांविरोधातील लढाईत मोठं यश; एनडीएच्या काळात भारतीयांचा काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला

नवी दिल्ली : स्विस बँकेच्या BIS डेटानुसार, 2017मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट नोंदवली गेली आहे. एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये तब्बल 80 टक्के कपात झाली आहे. नॉन बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेत केला आहे. ते म्हणाले, स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही. अशा आशयाचं माझ्याकडे स्विस बँकेनं दिलेलं लेखी उत्तर आहे.

काही दिवसांपूर्वी एसएनबी अर्थात स्विस नॅशनल बँकेने एक अहवाल समोर आणला होता. ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार भारतीयांचा काळा पैसा ५० टक्क्यांनी वाढल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालामुळे मोदी सरकारविरोधात आवाज उठवण्याची संधी विरोधकांना मिळाली होती. याच अहवालाचा आधार घेत इंडियन नॅशनल लोक दलाचे खासदार राम कुमार कश्यर यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना स्विस बँकेतला भारतीयांचा पैसा वाढला नसून कमी झाला आहे असे गोयल यांनी सांगितले.

2016मध्ये नॉन बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर होता. आता 2017मध्ये त्यात घट होऊन तो 52.4 कोटी डॉलर झाला आहे. बँकेच्या माहितीनुसार, स्विस नॉन बँक कर्ज आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013पासून 2017पर्यंत यात 80 टक्के कमी नोंदवली गेली आहे.नॉन डिपोझिट लायब्लिटीजमध्ये भारतातल्या स्विस बँकेच्या काही शाखांच्या कारोभाराचाही समावेश झाला होता. यात बँकांमध्ये होणा-या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांचाही अंतर्भाव आहे. स्विस बँकेचे अॅम्बेसेडर एंड्रियास बॉम यांच्याकडून पीयूष गोयल यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. ब-याचदा स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा काळा असल्याची वदंता आहे, असंही डाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS)नं स्पष्ट केलं आहे.