fbpx

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; या तारखेपर्यंत करू शकता अनुदानासाठी अर्ज !

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कांद्यांच्या दरात झालेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यासाठी राज्य शासनाने 200 रुपये प्रती क्तिंटल आणि जास्तीत 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

शासनाने यापूर्वी कांदा अनुदानासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. दि. 15 डिसेंबर नंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहाता कांदा उत्पादक शेतक्ऱ्यांसाठी शासनाने पुन्हा एक महिन्याची म्हणजे 31 जानेवारी, 2019 पर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु. 200 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले होते. 30 डिसेंबर 2018 नंतरही कांद्यांच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या योजनेपासून कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्थी या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही देशमुख यांनी सांगितले आहे.

2 Comments

Click here to post a comment