आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांची आगळीवेगळी भावनिक पोस्ट

आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर आता सोशल मिडियावरून देखील आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी मागणी होत आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय” असा आशय आणि त्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो, असे पोस्टर सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.

येत्या १३ जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करु नये. त्याऐवजी दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी समर्थकांना केले आहे.

तर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसा निमित्त “हीच वेळ आहे, हीच संधी आहे, महाराष्ट्र वाट पाहतोय” असा आशय लिहित पोस्ट शेअर केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उतरावे अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसत आहे.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार या चर्चेल आता बळ मिळालं आहे. कारण, यासाठी आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघाची चाचपणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकाऱ्यांची आदित्य ठाकरे यांनी सुमारे अर्धा तास बैठक घेतली. या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, वरळीचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.