…तर दानवे विधानसभा लढणार ?

रोहित गिरी : ऐतिहासिक औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक लागला. त्यामुळे औरंगाबादेतील गंगापूर विधानसभेची गणिते बदलली आहेत. विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी प्रामाणिकपणे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार केला. असं स्वतः चंद्रकांत खैरे यांनी मान्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेत झालेल्या जाहीरसभेत प्रशांत बंब यांनी राज ठाकरेंवर टीका करत लक्ष वेधून घेतले होते. पण प्रशांत बंब हे खैरे यांना स्वतःच्या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात अपयशी ठरले आहेत.

गंगापूर विधानसभेत गंगापूर आणि खुलताबाद ह्या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघातून लोकसभेला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. यामुळे सध्या आ.प्रशांत बंब यांच्या गोटात खळबळजनक वातावरण आहे. विधानसभेचे पडघम वाजू लागल्यानं उमेदवारांच्या मतदारसंघातील फेऱ्या वाढल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. यावेळी अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश करून विधानसभा लढवली. आणि त्यांनी विजय मिळवत ते विधानसभेत पोहचले. शिवसेनेकडून औरंगाबादाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा पराभव झाला. आता मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने यावेळी गंगापूर विधानसभेचे चित्र वेगळे दिसले तर नवल वाटणार नाही.

गेल्या ५ वर्षापासून शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गंगापूर विधानसभेत शिवसैनिकांचे जाळे निर्माण केले आहे. ते शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जातात. त्याचबरोबर शिवसेनेकडून उमेदवारीसाठी बऱ्याच नेत्यांची मांदियाळी आहे. यात माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, युवासेनेचे संतोष माने, खुलताबादचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांची नावे आघाडीवर आहेत. यांनी मतदारसंघ पिंजून काढल्याने हेही उमेदवारीवर हक्क सांगू शकतात. अंबादास दानवे यांनी स्वकीयांचा विरोध जरी मोडून काढला. तरीही भाजप आमदार प्रशांत बंब यांचा विरोध मोडून काढणं शक्य होईल असं सध्या तरी वाटत नाही. येणाऱ्या विधानसभेत शिवसेना, भाजप युती झाल्यास ह्या जागेवर भाजप दावा करेल हे निश्चित. ही जागा सध्या विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या रूपाने भाजपच्या वाट्याला असल्याने, ते ही जागा सोडतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जुन्या फाॅॅर्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा सांगण्याची दाट शक्यता आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन यांना देण्यासाठी आतापासूनच खल सुरू झाला आहे. युतीमध्ये मतदारसंघ भाजपकडे गेल्यास शिवसेनेचे इच्छुक बंडखोरी करणार की, पक्षादेश पाळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.