दोन दिवसात लोकसभेसाठी परभणी मतदार संघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार होणार फायनल

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन गेले अनेक दिवस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरु होती पण आता समान जागा पदरात घेऊन दोन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली आहे.राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी चाचपणी साठी रायगड , कोल्हापूर , परभणी , उस्मानाबाद , बीड या मतदार संघांची प्रथम निवड केली. त्यात परभणी मतदार संघाचा लोकसभेचा उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे.

परभणी मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादीच्या बाजूने राजेश विटेकर , प्रताप देशमुख आणि बाळासाहेब जामकार यांच्याकडून तिकिटाची मागणी होत आहे. तर राजेश विटेकर यांना अनेक नेत्यांचा पाठींबा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभेचे तिकीट राजेश विटेकर यांच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे.

राजेश विटेकर यांना आ. बाबाजानी दुराणी , आ. विजय भांबळे ,आ. मधुसूदन केंद्रे या तीनही आमदारांचा पाठींबा असून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींचा देखील पाठींबा आहे. तसेच तिन्ही आमदारांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदार संघात परिवर्तन आणण्यासाठी राजेश विटेकर यांच्या सारखा दुसरा उमेदवार नाही याबाबतची सविस्तर माहिती पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना दिली.

अशा अनेक सर्व बाबी लक्षात घेऊन शरद पवार यांनी दोन दिवसात उमेदवाराच अंतिम नाव घोषित करण्यात येईल तसेच हा उमेदवार पक्षास विजय संपादन करून देणारा असेल, असे सांगितले. मुंबईतील प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत हि बैठक पार पडली.