विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा सुरळीत, सोमवारी १९ हजार विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाईन सुरु आहेत. १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी पहिल्याच दिवशी १९ हजार ३८४ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च तसेच ६ एप्रिल पासून सुरु करण्यात आल्या. दरम्यान १५ एप्रिल ते २ मे या दरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले होते. यानंतर गेल्या आठवडयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक झाली होती. तर येथून पुढील सर्व पेपर हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ‘कोविड‘ ची सर्व नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच सर्वच महाविद्यालयात ‘आयटी‘ कॉऑर्डिनेटरची संख्या दुप्पटीने वाढवली आहे. पदवी परिक्षेचे उर्वरीत पेपर ३ मे पासून तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी २८ एप्रिल ते २ मे दरम्यान ‘ऑनलाईन मॉक टेस्ट‘ झाली आहे. पाच दिवसात ९९ हजार ३१९ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील चारही जिल्ह्यात परीक्षा यशस्वीपणे होत आहे. एकाही विद्यार्थ्यांची लेखी तक्रार परीक्षा विभागास अद्यापही मिळालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात ९ हजार ३८३ तर दुपारी १० हजार १ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली, असल्याची माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या