fbpx

डार्विनचा सिद्धांत खोटाच केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा साक्षात्कार !

satyapal sinh

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा मानवी उत्क्रांतीचा डार्विनचा सिद्धांत खोटा असल्याचा साक्षात्कार झाला आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सोहळ्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपा खासदार सिंह बोलत होते. ते म्हणाले, जानेवारी महिन्यात मी याबाबत विधान केलं होतं ते काही जोक म्हणून केलं नव्हतं तर गांभीर्याने केलं होतं. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी राहिलो आहे. मी रसायन शास्त्रात पीएचडी केलं आहे. मला विज्ञानाची समज आहे. जे लोक माझ्याविरोधात बोलतायेत ते बोलतीलच. पण त्यावेळी अनेक अशीही लोकं होती ज्यांनी मला आणि माझ्या विधानाला पाठिंबा दिला. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर पुढील १० ते २० वर्षांनी, पण लोकं माझं विधान स्वीकारतील.

दरम्यान , जानेवारीमध्ये औरंगाबाद इथं आयोजित अखिल भारतीय वैदिक संमेलनात बोलताना , ते म्हणाले होते, ‘काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, पशू, पक्षी आणि जनावरांचा आवाज ऐकून मनुष्य भाषा बोलण्यास शिकला. मी म्हणतो की, असे बोलणार्यांच्या मुलांना काही वर्ष जंगलात नेऊन सोडा. बघू, तेथील पशू, पक्ष्यांच्या आवाजावरुन ते कोणती भाषा शिकतात ते’. सूर्य, पृथ्वी, चंद्राच्या निर्मितीनंतर भगवंतांनी वेदवाणी केली व जगातला मुनष्य तेच वेद पहिले शिकला, असेही ते बोलून गेले. ईश्वराच्या ज्ञानरुपी गंगेतून मनुष्य वेद म्हणण्यास शिकला. हे सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.

आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय, तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डार्विन या शास्त्रज्ञाचा तो सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात 35 वर्षांपूर्वीच सिद्ध केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला.