खाते वाटपाचा अधिकार पंतप्रधानांचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन

नागपूर : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा, कुणाल कुठले खाते द्यावे हा अधिकार पंतप्रधानांना आहे. रेल्वे मंत्री म्हणून प्रसिद्ध माध्यमात आपल्या नावाची चर्चा असली तरी पुन्हा नव्या खात्याचा भार पेलण्याची शक्ती नसल्याचे प्रतिपादन केंदीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवारी नागपुरात केले.घरी गणेश स्थापना केल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.

यासंदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, कालच अमेरिकेतून परतलो. इथे आल्यावर माध्यमातून मला नव्या खात्याची जबाबदार मिळणार असल्याची माहिती मिळाली. पण, कुणाला कोणते खाते द्यावे याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. रस्ते परिवहन आणि शिपिंग विभागाचेच एवढे काम आहे की थकलो आहे. याच खात्यात खुप काही करायचे आहे. त्यामुळे पुन्हा नव्या खात्याचा भार पेलण्यास वेळ नसल्याचे गडकरी म्हणाले.

दरम्यान अनेक देशात खास करून अमेरिकेत रस्ते वाहतुक, नागरी उड्डयन, शिपिंग आणि रेल्वे अशी सर्व इन्फ्रास्ट्रक्चरची खाती एकाच इन्फ्रास्ट्रक्चर विभागाकडे असतात पण असे खाते कुणाला द्यायची याचा निर्णयही पंतप्रधान घेत असतात असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात विचारले असता गडकरी म्हणाले की, फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले आहे. केंद्रात चांगले काम करण्याची त्यांची योग्यता आहे. पण राज्यातील अनेक आव्हाने आणि समस्या बघता महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी सांगितले.