fbpx

Unicode- युनिकोड १० मध्ये नवीन इमोजींचा समावेश

युनिकोड १० ही आवृत्ती अधिकृतपणे सादर करण्यात आली असून यात ५६ नव्या इमोजींसह काही दुर्मीळ भाषांना सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

युनिकोड कन्सोर्टीयमने युनिकोड १० ची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यानुसार युनिकोडमध्ये नव्याने ८५१८ अक्षरांचा समावेश करण्यात आला असून आजवरची अक्षरांची एकत्र संख्या १,३६,६९० इतकी झाली आहे. तर नव्या आवृत्तीत चार नवीन स्क्रीप्ट देण्यात आले असून यावर एकंदरीत १३९ स्क्रीप्ट झालेले आहेत. याशिवाय यात ५६ इमोजींचा समावेश करण्यात आला आहे.

इमोजी हा मानवी संवादाचा अविभाज्य घटक बनू पाहत आहेत. या पार्श्‍वभूमिवर युनिकोडने आता ५६ नव्या इमोजींना उपलब्ध केले आहे. यात व्हँपायर, सँडविच, मुस्लीम महिला वापरत असणारा हिजाब, झेब्रा, जिराफ आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे युनिकोडने आता बीटकॉईनची इमोजीदेखील सादर केली आहे. याआधी युनिकोडतर्फे काही इमोजी सादर करण्यात आल्या होत्या. युनिकोड १० सह आता नवीन इमोजींची संख्या ६९ झाली असून या सर्व भावचिन्हांचा वापर आता कुणीही करू शकेल. येत्या काही महिन्यांमध्ये युनिकोड १० हे अपडेटच्या स्वरूपात विविध ऑपरेटींग सिस्टीम्ससाठी कार्यान्वित केले जाणार आहे.आणि आपण त्यांना व्हाटसअ‍ॅपसह विविध माध्यमातून वापरू शकतो.

युनिकोड १० मधील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे यात काही नवीन भाषांना डिजीटल साज चढविण्यात आला आहे. यात मध्य भारतातील आदीवासी भागांमध्ये बोलल्या जाणार्‍या गोंडी बोलीचा समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील इस्माईल खोजा या जमातीच्या लोकांनी अरबी अक्षरांना गुजरातीत भाषांतरीत करण्यासाठी वापरलेली चिन्हे तसेच मल्याळमच्या सुरियानी या बोलींनाही युनिकोडचा सपोर्ट मिळाला आहे. अर्थात या बोलीभाषा आता युनिकोडच्या स्वरूपात सायबरविश्‍वात वापरता येणार आहेत.