दुर्दैवी! कर्नाटकात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

बंगळुरू : ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. पण ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात न आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चामराजनगरमधील सरकारी रुग्णालयाला शेजारील म्हैसूर जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. पण रविवारी हा पुरवठा नेहमीप्रमाणे होऊ शकला नाही. परिणामी, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी आपत्कालीन कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री एस. सुरेश यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या