fbpx

बारामती : गाढवांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा- वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत असणारे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि त्यांचा पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यावेळी जानकर हे मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागने घेतलेला गाढवांच्या कत्तली रोखण्यासाठी घेतलेला निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.

औषध आणि इतर वापरांसाठी गाढवांच्या कत्तली होण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांची संख्या कमालीची घटली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गाढवांच्या रक्षणाचा अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झाल्यानंतर जानकर यांच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्हाधिकऱ्यांना नोटीस पाठवून, गाढवांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी नुकतीच गाढवांची तस्करी करणाऱ्या काही आरोपींना रंगेहात पकडले .दरम्यान, यातील दोन आरोपी फरार झाले आहेत. ही टोळी आंध्र प्रदेशातील असून पंधरा गाढवांनी भरलेला आयशर ट्रक बारामती शहर पोलिसांनी पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून ताब्यात घेतला आहे. गाढवांची तस्करी करणारी टोळी रात्रीच्या वेळी फिरत असून या गाढवांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांनुसार मिळताच ही कारवाई करण्यात आली.

याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश शेलार, पीएसआय सतीश अस्वर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जगताप, रुपेश साळुंखे, नूतन जाधव, अजित राऊत, तुषार सानप, पोपट नाळे, तुषार चव्हाण यांनी सदर टोळीचा पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे आरोपींसह ट्रक पकडला आहे. पंधरा गाढवांपैकी दोन गाढवांचा यावेळी मृत्यू झाला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.