‘कुठल्याही परिस्थितीत बाधित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेऊ नका’, राजेश टोपेंचे आदेश

जालना: कोरोना रुग्णांची संख्या आता काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा पहिल्या स्तरात आला आहे त्यामुळे येथील सर्व बाबतीत नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नियम शिथिल जरी करण्यात आले असले तरी देखील नियमांचे पालन करावेत, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक व कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी. हाय रिस्क व लो रिस्क सहवासितांच्या चाचण्या अधिक कराव्यात. गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचे निर्देश देत कुठल्याही परिस्थितीत बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलिस विभागाची मदत घेण्यात येऊन त्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची सूचनाही टोपे यांनी केली.

कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णांची दररोज ६ मिनिटे वॉक टेस्ट घेण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या

IMP