अपराजित योद्धा

bajirao peshve jayanti

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाय रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हंटले तर काही वाउगे ठरणार नाही. ज्यांने कधी पराभव पहिलाच नाही, आपल्या मनगटाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली, दिल्ली काबीज केली.ज्यांच्या पराक्रमामुळे इराण पर्यंतच्या पातशाह्या हादरल्या त्या जगातल्या एकमेव अजेय,अपराजित योद्धयाचे नाव म्हणजे बाजीराव पेशवा.उत्तम संघटन कौशल्य असलेला हा पराक्रमी योद्धा. मराठ्यांना नर्मदे पलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव अतिशय आदराने घ्यावे लागेल.

बाजीरावांचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० साली झाला. वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरावांना बहाल केली. केवळ २० वर्षांची अल्प पण झळाळती कारकीर्द. या कारकिर्दीत बाजीरावांनी ४० महत्वाच्या लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंम्बर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), मालखेड (१७२७), अहमदाबाद (१७३१), उदयपूर (१७३६), फिरोजाबद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशा अनेक लढायांचा समावेश आहे. मॉँटगोमेरी आणि ग्रँट डफ सारखे शत्रू सुद्धा ज्याच्या युद्ध नेतृत्वाचे कौतुक करतात. वेगवान हलचाल हेच त्यांचे प्रभावी शस्त्र होते. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्यांची रणनिती आपण *मैदानी लढाई* लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.

उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. बाजीराव हे पराक्रमी होते त्यांच्या कडे दिलदारपणा होता. आणि म्हणूनच शाहूमहाराज म्हणत की,’मला जर एक लाख फौज आणि बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावांचीच निवड करेन’. एवढा एक उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो की,वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना आहे. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. छत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्य झाले.

maratha empire

बाजीरावांच्या युद्ध कौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही पण अमेरिकेत लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहेत.छत्रपती शिवाजी महारांची अफझलखान वध आणि बाजीराव पेशव्यांची पालखेडच्या युद्धाची मोहीम आजही अमेरिकेत शिकविली जाते. त्यासाठी पालखेडच कायमस्वरूप मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावांनी निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कस पकडलं याचा ‘स्ट्रेटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलां जातो.आणि आपल्या कडे कित्तेक जणांना त्यांची जयंती सुद्धा माहिती नसते. आम्ही बाजीरावांची ओळख फक्त मस्तानी सोबतच करतो. चित्रपट, मालिका सुद्धा बाजीराव-मस्तानी अशाच नावाने बनतात. मस्तानीची आठवण त्याने काढावी जो बाजीरावांचे पराक्रम जाणतो.

बाजीराव हे मोठे युद्धनीतिज्ञ होते. म्हणूनच ते अजेय ठरले. त्यांच्या कारकिर्दीत ते एकही लढाई ते हरले नाही म्हणूनच त्यांची तुलना नेपोलियन सारख्या युध्दनिपूण सेनापतीशी केली जाते.
अशा या प्रतापसूर्याची आज जयंती. शासकीय पातळीवर बाजीरावांची जयंती कधी साजरी होईल कुणास् ठाऊक? पण आपण मात्र या वीराची आठवण ठेवायला हवी त्यामुळे हे चार शब्द त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि प्रतापी बाजीरावांना शत शत नमन करून थांबतो….!!!

@ कृष्णा नंदकुमारराव रामदासी (बीड)