पाणी नाही घरात, दारू पोहोचली दारात

अकोला / सचिन मुर्तडकर : मातृशक्तीच्या सन्मानाचे तुणतुणे वाजविणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या दारूच्या दुकानांनी सध्या अकोल्यात मातृशक्तीचे घराबाहेर पडणे मुश्किल करून ठेवले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पण दारूची दुकाने मात्र रहिवासी वस्त्यांमध्ये थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहेत.

राष्ट्रीय महामार्गालागत 500 मीटर च्या आत बार व दारूची दुकाने नकोत या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही राष्ट्रीय महामार्गलगतची दारूची दुकाने थेट शहरात नागरी वस्त्यांमध्ये पोहोचली. गोरक्षण मार्ग हा शांतताप्रिय व उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. या मार्गावर दारूचे दुकान म्हणजे कोणालाही न पटण्यासारखी बाब आहे. अशा सूज्ञ लोकांच्या परिसरात एक दोन नव्हे तर तब्बल तीन चार दारूची दुकाने सुरू करण्यास पारदर्शक व स्वच्छ प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. गौरक्षण रोड हा परिसर अनेक वर्षांपासून सुशिक्षित, शांत,सूज्ञ व उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. या परिसरात आपले घर असावे असे अकोल्यातील प्रत्येकाला वाटतं. पण आता या परिसरात राहायला असनाऱ्या लोकांनाही हा परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे. कारण धार्मिक व श्रद्धाळू लोकांच्या या परिसरात काही दिवसांपासून रातोरात दारूचे दुकान सुरू करण्यात आले. शहराच्या इतर भागातही हीच परिस्थिती आहे.

अच्छे दिनचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या लोकांनी अच्छे दिन तर आनलेच नाही पण ज्या मातृशक्तीच्या सन्मानाचे तुणतुणे वाजवून मातृशक्तीची मते घेऊन भाजप सत्तेत आला त्याच मातृशक्तीला आज रस्त्यावर फिरणे मुश्किल करण्याचे काम या भाजप सरकारने व भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी केलेले आहे. ही भाजपची भूमिका व ध्येय धोरणे भाजपला घेऊन बुडतील. यात आता काहीही शंका नाही. गोरक्षण रोड वासीयांनी एक समिती स्थापन करून या दारूच्या दुकानांना हटविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने केली.

बाजारपेठ बंद, स्वाक्षरी मोहीम, धरणे, निवेदने अशी अनेक आंदोलने या समितीने केली, पण महानगरपालिकेपासून केंद्रापर्यंत सत्ता असलेले भाजपचे सरकार आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या या दारू दुकानांच्या पाठीशी एवढे खंबीर उभे आहे की आतापर्यंत या दुकानांमधील एकही दुकान हालले नाही किंवा बंद झाले नाही. पिण्यासाठी पाणी नसलेल्या अकोल्यात पारदर्शक कारभार असलेल्या भाजप सरकारने दारू मात्र लोकांच्या घरापर्यंत पोहोचविल्याने पारदर्शक व स्वच्छ कारभाराच्या या नव्या प्रकाराबाबत लोकांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे.