वसई-विरार पालिका कर्मचारी पक्षपाती-भाजप

BJP-flag

पालघर : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाअंतर्गत पालिकेकडून अनधिकृत बॅनर-पोस्टर्स काढण्यात येत आहेत. मात्र हे बॅनर काढत असताना पालिकेचे प्रशासन, कर्मचारी पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे अनेक विनापरवाना बॅनर शहरात तसेच लागले असून विरोधकांचे बॅनर मात्र तात्काळ काढण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यातच दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या श्रद्धांजलीचे विरार पूर्वेला लावलेले बॅनर लगेचच काढले गेल्यानेही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने पालिकेने स्वच्छता अभियानावर भर दिला आहे. याअंतर्गत शहरातील अनधिकृत बॅनर-पोस्टर्सही काढण्यात येत आहेत. मात्र हे बॅनर काढताना ठराविक बॅनरच काढले जात असल्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर विरार पूर्व भागात भाजपप्रणित संघटनांनी लावले होते. भाजपने लावलेले हे श्रद्धांजलीचे बॅनर एक-दोन तासांतच काढण्यात आले. स्वच्छ भारत अभियानचे कारण त्यासाठी दिले गेले. परंतु याच परिसरातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे बॅनर व अन्य कार्यक्रमांचे बॅनर आजतगायत काढण्यात आलेले नाहीत. हे पालिका प्रशासनाचे पक्षपाती धोरण असल्याचा आरोप भाजपने केला.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व पक्षांचे, संघटनांचे बॅनर काढायला हवेत व सर्वांना एकसमान न्याय द्यायला हवा. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जाणुनबुजून फक्त भाजपचेच बॅनर काढले, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. डिसेंबरमध्ये सत्ताधारी पक्षातर्फे झालेल्या कार्यक्रमांचे तेव्हा लावलेले विनापरवाना बॅनर शहरात आजही तसेच दिसत आहेत. नगरसेवकांचे बॅनर काढण्यात आलेले नाहीत. मग खासदारांना श्रद्धांजली वाहत असल्याचे बॅनर एक-दोन तासांतच का काढण्यात आले, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला असून पक्षपातीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.