उमा भारतींनी घेतली सरसंघचालकांची भेट

Uma Bharati

नागपूर –  केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री साध्वी उमा भारती यांनी आज, मंगळवारी नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रालयाव्दारे स्थापन करण्यात आलेल्या गंगा स्वच्छता मंचची माहिती त्यांनी सरसंघचालकांना दिली. उमा भारती यांचे संध्याकाळी हेलिकॉप्टरने नागपुरात आगमन झाले. त्यानंतर त्यांचा ताफा थेट महाल येथील संघ मुख्यालयात पोहचला.

यावेळी त्यांनी सरसंघचालकांशी सुमारे 30 मिनीटे चर्चा केली. यादरम्यान त्यांच्या मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या गंगा स्वच्छता मंचची माहिती त्यांनी दिली. केंद्री मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने गंगा स्वच्छतेसंदर्भात सुरू असलेल्या घडामोडी आणि उमा भारती यांच्या मंत्रालयांतर्गत असलेले अपडेटस् यांची माहिती सरसंघचालकांना देण्यात आली.

या भेटीनंतर त्या ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य यांच्या निवासस्थानी गेल्यात. त्यानंतर रात्री तामीळनाडू एस्प्रेसने त्या भोपाळला रवाना झाल्यात. गंगा स्वच्छतेची माहिती दिली-उमा भारती सरसंघचालकांशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना उमा भारती म्हणाल्या कि, गंगा स्वच्छता अभियान हा डॉ. मोहन भागवतांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आपण त्यांना यासंदर्भात वेळोवेळी अपडेटस् देत असतो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात गंगा स्वच्छता अभियान जोमात सुरू आहे. तसेच आपल्या मंत्रालयाव्दारे गंगा स्वच्छता मंच स्थापन करण्यात आला असून त्याची माहिती या भेटीत दिल्याचे उमा भारती यांनी सांगितले.