कुरापती काढून वातावरण चिघळवण्याचा कुलगुरूंचा प्रयत्न ; सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी

udhan

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून विद्यापीठातील वातावरण तापले असताना आता कुलपतींनी हस्तक्षेप करून कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन सदस्य उल्हास उढाण यांनी ही मागणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यावरून सध्या मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. चालू प्रकरणामध्ये चोपडे यांची भूमिका नेहमीच वादात सापडली आहे.तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश, पेट परीक्षेतील गोंधळ, साई अभियांत्रिकी मासकॉपी प्रकरण, विविध वादग्रस्त निर्णयांमुळे विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभारामुळे विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेल्या असल्याची चर्चा आहे.त्यामुळे कुलपतींनी हस्तक्षेप करून कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन सदस्य उल्हास उढाण यांनी केली आहे.

काय मागणी केली आहे उढाण यांनी 

शिक्षणप्रेमी नागरिकांसह विविध संघटना, प्रसारमाध्यमांद्वारे कुलगुरूंच्या कारभारावर चौफेर टीका सुरू आहे. वादग्रस्त निर्णयांमुळे विद्यापीठाचे हित आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. विविध विभागांतील प्रमुखांसह अधिकारी, कर्मचारी त्रस्त आहेत. प्रशासनामध्ये ताळमेळ राहिलेला नाही. कुलगुरूंचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. मुंबई विद्यापीठासारखी ‘बामू’ची अवस्था झाली आहे. याप्रकरणी कुलपतींनी हस्तक्षेप करून कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून सक्षम व्यक्तीकडे कारभार दिल्यास विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या हिताचे ठरेल आणि विविध अधिकार मंडळाची निवडणूक पार पाडणे सोइस्कर होईल अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.छत्रपतींच्या पुतळ्याची ढाल पुढे करून आणि आमदार सतीश चव्हाण यांची बदनामी करून कुलगुरूंच्या गलथान कारभारावरील कुलपती कार्यालय आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही कुरापत काढण्यात येवून वातावरण चिघळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे उढाण यांनी म्हटले आहे.