एक्झिट पोल सत्याचा विपर्यास : कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्याला पूर्ण बहुमत देणारे ठरणार नाहीत, हे लक्षात येताच देशातील काही प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष यांच्यावर दबाव आणण्यासाठी एक्झिट पोलच्या माध्यमातून संभ्रमाचे (भीतीचे) वातावरण निर्माण करत काँग्रेस आणि इतर पक्षांनी चालवलेल्या बहुमताने सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण केला आहे. या विविध चॅनल्सनी दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये दिसून येणारी साधर्म्य ही संशयास्पद असून, या आकडेवारीद्वारा निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार करून सौदा करण्याचा घाट घातला आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते उल्हास पवार यांनी दिली.

एकूण पाच राज्यात निवडणूक करताना ईव्हीएम मशीनला हात न लावता ईव्हीएमबद्दलची विश्वासार्हता निर्माण करून प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीत मात्र महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये आपले संख्याबळ टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला आहे, अशी शंका देशातील ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, शरद पवार या प्रमुख नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केली आहे. ही सारी निवडणूकच इव्हेंट मॅनेजमेंट करून भाजपाने भारतीय संसदीय लोकशाहीत कलंकित केली आहे, असेही उल्हास पवार यांनी म्हटले आहे.