हिंमत असेल तर उदयनराजेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा – अमोल मिटकरी

amol mitkari

टीम महाराष्ट्र देशा :साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे त्यांचा प्रवेश झाला. शिवरायांच्या विचाराने भाजप काम करत आहे, त्यामुळे प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं उदयनराजे यांनी सांगितले आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपात हिम्मत असेल तर आता उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावं असं विधान केले आहे. तसेच ईव्हीएमच्या जोरावर जर तुम्ही सत्तेत आला तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उदयनराजे असायला हवेत असंही मिटकरी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मिटकरी यांनी ‘उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची भाजपात हिम्मत आहे का? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट करावे असंही मिटकरी म्हणाले आहेत. मिटकरी यांच्यासह नवाब मलिक यांनीही उदयनराजेंवर टीका केली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला अशी टीका केली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘साहेब उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केले, सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला’ असं ट्वीट करत शरद पवारांना प्रश्न विचारला आहे.