उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : सातारचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. खुद्द उदयनराजे यांच्याकडून देखील तसे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याच बोलले जात आहे. उदयनराजेंनी जर असा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पाटील यांनी खासदार उदयनराजेंनी अद्यापपर्यंत पक्ष सोडून जाण्याची भाषा केलेली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्येच असून, त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रश्नच येत नाही असं विधान केले आहे. त्यामुळे उदयन राजे भविष्यात काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी ‘आमचे निष्ठावंत नेते आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आम्हाला सांगत असताना माध्यमेच त्यांच्यावर शंका उपस्थित करीत आहेत असंही विधान केले आहे. तसेच जे नेते मंडळी आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात गेले आहेत त्या जागेवर सक्षम पर्याय शोधण्याचे काम सुरु आहे असंही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, फौजिया खान तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.