पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

udyanraje bhosale vs pawar saheb

कऱ्हाड : शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असून, मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या कॉलर’चे अनुकरण केले, अजून काय पाहिजे अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. लोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार श्री. भोसले आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक हणमंत पवार, विजय यादव उपस्थित होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भल्या – भल्यांची कॅालर आपल्यापुढे खाली होते. असं म्हणत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान या टीकेला उत्तर देताना शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॅालरची केलेली स्टाइल मला आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले असंही यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा आत्ताच सांगू शकत नाही. पण चर्चा झाली एवढे नक्की अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उडवलेल्या कॉलरबाबत ते म्हणाले, शरद पवारसाहेब आदरणीय आहेत आणि मी त्यांना मानतो. आज या वयातही ते मोठ्या प्रमाणात काम करतात. सकाळी सात वाजता कामासाठी ते कार्यालयात तयार असतात. मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. कुणीतरी दाद दिली, हे बास झाले. अजून काय पाहिजे?” असं ते म्हणाले