काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष- उदयनराजे भोसले

blank

टीम महाराष्ट्र देशा:- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तेसच काँग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही त्यांनी सातारा येथे बोलताना दिला. भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आज उदयनराजे भोसले हे महाजानदेश यात्रे मध्ये सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

उदयनराजे पुढे बोलताना म्हणाले की ,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार काळात जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाहीत. माझ्याकडून नेण्यात आलेल्या कामांच्या प्रस्तावांना कायम केराची टोपली दाखवली गेली, तरीपण मी १५ वर्षे सोबत होतो, खरतर याबाबत राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायला हवा होता. असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले की, त्या काळात सरकारची इच्छाशक्ती व नियोजन नसल्यामुळे कामं झाली नाहीत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारची स्तुती करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामं मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर उदयनराजेंचे घुमजाव 

ईव्हएमच्या मुद्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, जनता शेवटी कामांकडे पाहून मतदान करते. हे सरकार कामं मार्गी लावणारं सरकार आहे, म्हणूनच जनतेने या सरकावर विश्वास ठेवला. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून माझ्या मनात असलेल्या प्रश्नांच मला उत्तर मिळालं असल्याचेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान भाजपच्या महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात दुपारी आगमन झाले. त्यानंतर भव्य सभा भरवण्यात आली होती. यात नुकतंच भाजपात आलेले उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपाच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले.