समृद्धी महामार्गाबाबतच्या भूमिकेवरून शिवसेना मवाळ.

shivsena supports samrudhi highway

औरंगाबाद – समृद्धी महार्गाचा प्रकल्प उधळून लावण्याची भूमिका उद्धव ठाकरे घेतील अशी भाबडी आशा बाळगणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी औरंगाबादेत भेट घेतल्यानंतर समृद्धी महामार्गाला विरोध नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महिनाभरापूर्वी उद्धव यांनी मुंबईत समृद्धी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले होते.त्यामुळे शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात केंब्रिज शाळा,माळीवाडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर सोमवारीऔरंगाबाद तालुक्यातील पळशी,माळीवाडाच्या शेतकऱ्यांशी उद्धव यांनी संवाद साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

समृद्धी सर्वांनाच हवी असते.ती आम्हालाही हवीच आहे.आमचा विकासाला विरोध नाही.फक्त शेतकऱ्यांचे थडगे बांधून आम्हाला विकास नको.जमिनी न देऊ इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकत्रित चर्चा करून पर्याय शोधू.
हा प्रकल्प होऊ नये अशी आमची मागणी नाही फक्त शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये,अशी भूमिका आहे.आम्ही विरोध केला असता तर राज्यात अनेक गोष्टी झाल्या नसत्या.मुंबईत उड्डाणपुलालाही विरोध केला नाही.मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आम्हीच तयार केला.फक्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेत आहोत,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कोणी स्वागत करो ना करो भाजप मात्र स्वागत करताना दिसणार हे मात्र निश्चित.