सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाना

udhav thakrey

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मृत्यूनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वाढदिवस साजरा केला होता. यावरुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर निशाना साधला.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा दाखला देत शिवसेनेने भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला.

Loading...

 काय आहे आजचं सामना संपादकीय?

महाराष्ट्राचा वीर सुपुत्र कौस्तुभ राणे याचे पवित्र पार्थिव मातृभूमीत कायमचे विलीन झाले. मेजर राणे देशासाठी जन्मास आला, देशासाठी जगला व देशासाठीच हुतात्मा झाला. मेजर राणेसह तीन जवान कश्मीरात पुन्हा शहीद झाले. फक्त निवडणुका जिंकण्यातच मग्न असलेल्या राज्यकर्त्यांनी शरमेने मान खाली घालावी असे पाकडे तांडव कश्मीरात सुरू आहे. कडेकोट बंदोबस्ताचे सुरक्षा पिंजरे सभोवती घेऊन फिरणाऱ्या दिल्लीतील राज्यकर्त्यांना मेजर राणे व तीन जवानांच्या बलिदानाचे महत्त्व कळणार नाही.

मेजर राणे याने वयाची तिशीही ओलांडली नव्हती. त्याला पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. वृद्ध मातापिता आहेत. पण देश हेच कुटुंब आहे हे मानून त्याने दुश्मनांशी युद्ध केले व अमर झाला. मेजर राणे यांचे कुटुंबीय मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात राहतात. कौस्तुभ याच्या वीरमरणाची बातमी आली व संपूर्ण परिसर, कुटुंबावर शोकाचे सावट पसरले. त्याच वेळी तेथील भाजप पुढाऱ्याच्या दारात वाढदिवसाचा जल्लोष सुरू होता. गाणे-बजावणे सुरू होते. शेजारी एक जवान शहीद झाल्याचे भान नसणारी ही बधिरताच रोज आमच्या तरुण पोरांचे बळी घेत आहे.

वाटेल त्या मार्गाने निवडणुका जिंकणे म्हणजे शौर्य नसून देशासाठी मरण पत्करणे हेच खरे शौर्य आहे. कश्मीर प्रश्नाचा सर्वाधिक विचका आणि आंतरराष्ट्रीय पचका गेल्या चार वर्षांतच झाला आहे. चरारे शरीफ दर्ग्यात घुसलेल्या अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे पोहोचविण्याचा प्रकार जितका राष्ट्रद्रोही तितकाच राष्ट्रद्रोही प्रकार रमझानच्या महिन्यात आमच्या जवानांवर शस्त्र्ासंधी लादण्याचा होता. कश्मीरात पाकडय़ांची घुसखोरी सुरूच आहे व त्यांना रोखताना आमचे जवान रोज शहीद होत आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्र जगात आहेत. अमेरिकेचे ट्रम्प व रशियाचे पुतीन हे तर खास दोस्त आहेत. पण पुतीन यांच्या रशियातच पाकिस्तानी सैन्याला खास प्रशिक्षण व युद्ध अभ्यास दिला जात आहे. तोच पाकडा आज आमच्यावर बंदूक ताणून उभा आहे. मोदी हिंदुस्थानची ही भूमिका पुतीन यांना कधी सांगतील काय? देशातील सर्व विरोधकांना धाराशायी केल्याचा आनंद मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो, पण पाकिस्तानला धाराशायी केल्याचा आनंद हा देश कधी साजरा करणार?

तो आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठीच जनतेने तुम्हाला सिंहासनावर बसवले आहे. मेजर कौस्तुभ राणे, कर्नल महाडिक यांच्यासह शेकडो मराठी जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. देशाचे संरक्षण करणे हाच महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. इतर ‘तागडी’बाज राज्ये फक्त नोटा मोजण्यात व उधळण्यात मग्न असताना शिवरायांचा महाराष्ट्र सीमेवर लढतो व हौतात्म्य पत्करतो. म्हणूनच राष्ट्रीय प्रश्नांवर मत व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध हक्क आम्हाला प्राप्त झाला आहे.

देशाचा ‘जीडीपी’ की काय तो वाढायचा तेव्हा वाढेल, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सैनिकांची बलिदाने कमी होणार आहेत काय? पैसा फेकून, ई.व्ही.एम. बंद पाडून निवडणुका जिंकणे आता सोपे आहे, पण ‘कौस्तुभच काय, आणखी मुले असती तर तीदेखील देशासाठी दिली असती,’ असे सांगणाऱ्या शहीद कौस्तुभच्या पित्याची हिंमत बाजारात मिळत नाही. ती विकत घेता येत नाही ती महाराष्ट्राच्या रक्तात आणि मातीतच आहे.

हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. हाच आमचा वारसा आहे. पाकिस्तानात सत्तापालट झाला आहे व हिंदुस्थानविरुद्ध सतत गरळ ओकणाऱ्या इम्रान खानचे म्हणजे तेथील सैतानी लष्करशाहीचेच राज्य तेथे आले आहे. हिंदुस्थानशी सतत युद्धाची भाषा करणे व कश्मीरात असंतोष निर्माण करणे हीच पाक सैन्याची रोजीरोटी आहे.

मग कश्मीर वाचवणे व सैनिकांची रोजची बलिदाने वाचविणे हे आपल्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य नाही काय? हौतात्म्य पत्करलेला प्रत्येक सैनिक अमर होतो, पण प्रत्येक हौतात्म्यानंतर मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होतो. कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबाने देशासाठी महान त्याग केला. जी कुटुंबे असे आपले आप्त गमावतात त्यांचे दुःख मोठेच आहे. ते राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, पण शहीदांना श्रद्धांजल्या देणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे.

त्यातच ते समाधानी आहेत. महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण कश्मीरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या व २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको! मग कुणी काय समजायचे ते समजो.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा