गडकोट मोहीम समारोपाला उद्धव ठाकरे, खा.उदयनराजे उपस्थित राहणार

udayanraje bhosale, Uddhav Thackeray and bhide guruji

सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारक-यांची प्रतापगड ते रायरेश्वर ही गडकोट मोहीम सुरू झाली. या गडकोट मोहिमेत सुमारे 50 हजार धारकरी सहभागी झाले आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे या मोहिमेचा मुक्काम आहे. गडकोट मोहिमेसाठी निघालेल्या भिडे गुरुजींना यावेळी सातारा पोलिसांकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राज्यभरातून आलेल्या 50 हजार धारकरी (कार्यकर्ते) प्रतापगडावर जमले होते. त्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेची भिडे गुरुजींच्या हस्ते आरती झाली.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई व मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. यानंतर प्रतापगड ते रायरेश्वर गडकोट मोहिमेला सुरुवात झाली. प्रतापगड उतरून तार तालुका महाबळेश्वर येथे मोहीमेचा शुक्रवारचा मुक्काम राहिला.

यावेळी तेथे पुरंदरचे बाबाराजे जाधवराव (ता. पुरंदर ) उपस्थित होते. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान झाले. धारक-यांचा दिवस सुरू झाला. सुरुवातीला बैठका आणि सूर्यनमस्कार हे व्यायाम झाले. त्यानंतर कवी भूषण यांचा छंद आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला आणि झेंडा पुढच्या मुक्कामासाठी रवाना झाला. पार येथील जंगलातून पायवाटेने धारकरी महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाले होते. संध्याकाळी हे सर्वजण महाबळेश्वरमध्ये दाखल झाले.

  याठिकाणी सु.गं. शेवड यांचे व्याख्यान झाले. धारक-यांचा रविवारचा मुक्काम बलकवडी येथील धरणाजवळ असले. तर सोमवारी झेंडा वासोळेमार्गे रायरेश्वरला रवाना होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी जांभळी पुलावर या गडकोट मोहिमेचा समारोप होईल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खा.उदयनराजे या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.