बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली तेव्हा शरद पवार काय करीत होते ? : उद्धव ठाकरे

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणे ही आमची चूक होती, तेव्हाचे विभागप्रमुख ऐकत नव्हते, असे अजित पवार आता म्हणत आहेत़. मग तुमच्या विमानाचे पायलट शरद पवार तेव्हा काय करीत होते? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत सभा घेतली़ यावेळी त्यांनी शरद पवारांसह अजित पवारांवरही जोरदार हल्ला चढविला़.

यावेळी ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणे ही आमची चूक होती, तेव्हाचे विभागप्रमुख ऐकत नव्हते, असे अजित पवार आता म्हणत आहेत़. मग तुमच्या विमानाचे पायलट शरद पवार तेव्हा काय करीत होते? कोर्टाने तुमच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तुम्ही वाचले़ नाहीतर राज्यभर आगडोंब उसळला असता आणि त्यात तुम्ही खाक झाले असते़. ती जर तुम्हाला आता चूक वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केला़.

दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा अजित पवार यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात दिला. ते म्हणाले होते की, त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करु नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करु नये, असे अजित पवार म्हणाले होते.