अहवालाची वाट पाहू नका, तात्काळ आरक्षण द्या – उद्धव ठाकरे

मुंबई: सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, सरकारने कोणतेही निकष लावावे पण त्वरित आरक्षण द्यावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी सेना हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत.

मराठा आंदोलकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, सरकारने आता महाराष्ट्र पेटण्याची वाट न पाहता समाजाला आरक्षण द्यावे असेही यावेळी ठाकरे म्हणाले.