fbpx

रावणाच्या लंकेत बुरखा बंदी, मग रामाच्या अयोध्येत कधी ?, उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

udhav thackeray and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो सामान्य नागरिकांचे प्राण गेले आहेत, बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी केली आहे. ‘सामना’ अग्रलेखातून राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं म्हंटले आहे.

फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न असल्याचं अग्रलेखात सांगण्यात आलं आहे.

श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी हिंदुस्थानला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार?, असा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे.

सक्तीच्या कुटुंबनियोजनाची भाषा केली, ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.) ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे. पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.