शशी थरूर म्हणजे काँग्रेसच्या कळपात सोडलेले ‘पोपट’, ते भाजपचीच भाषा बोलतात

टीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यास भारत हा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल असे वादग्रस्त वक्तव्य कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. थरूर यांच्या विधानामुळे हिंदूंचा अपमान झाला असून हिंदुस्थानची मान शरमेने खाली गेल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून भाजप आणि थरूर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शशी थरुर यांनी २०१९ मध्ये भाजप विजयी झाला तर भारत हा ’हिंदू पाकिस्तान’ होईल असे सांगितले. थोडक्यात काय तर, पुढील निवडणुकीत मोदींचे राज्य आले तर भारत ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. संघाचा हाच अजेंडा आहे व थरुर यांनी तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून मांडला आहे. थरुर हे मूर्खासारखे बोलतात व त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी असे भाजपास वाटते. पण थरुर हे भाजपचीच भाषा बोलत आहेत हे समजून घेणे गरजेच असल्याच सामनामधून सांगण्यात आल आहे.

मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरुर यांच्या बेताल विधानांमुळे फक्त करमणूक होत असते हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणात उगाच लुडबुड करू नये. मणिशंकर अय्यर हे सरळसरळ पाकिस्तानधार्जिणे आहेत. पत्नी सुनंदा पुष्करच्या संशयास्पद हत्येनंतर थरुर यांचे नाव ज्या बाईशी जोडले गेले ती पाकिस्तानी महिला होती आणि दिग्विजय सिंग यांच्याविषयी काय बोलावे!

जामा मशिदीच्या इमामाची ‘टोपी’ घालूनच ते वावरत असतात. हे सर्व लोक नावाने हिंदू आहेत. बाकी त्यांचे वर्तन एका अर्थाने ‘सुन्ता’ झाली असेच आहे. त्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये. पुन्हा ही तिन्ही मंडळी भाजपच्या राजकारणाला पोषक असेच बोलत असतात. लोकांना तर असाही संशय आहे की, थरुर, मणिशंकर, दिग्विजय हे म्हणजे भाजपने काँग्रेसच्या कळपात सोडलेले ’पोपट’ असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.