fbpx

स्थिर सरकारच्या नावाखाली पवारांनी मोदींना पाठींबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही 

टीम महाराष्ट्र देशा: स्थिर सरकार हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या परवलीचा शब्द आहे. त्यामुळे उद्या दोन-पाच जागा कमी पडल्यास पवारांनी स्थिर सरकारच्या नावाखाली मोदी यांना पाठिंबा दिला तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे यांनी शरद पवार यांच्या संधिसाधू भूमिकांचा समाचार घेतला आहे.

शरद पवार यांनी आजवर काँग्रेसविरोधात दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला. आताही आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून काही नवे घडवता येईल काय? या भूमिकेत ते आहेत. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

पवारांनी पंतप्रधानपदाच्या शोधातील तीन पात्रांची नावे जाहीर केली. आता चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत. अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही. असा खोचक टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

बाजारात तुरी असतानाच काँग्रेस महाआघाडीत पंतप्रधानपदावरून ‘मारामारी’ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे काँग्रेसचे सांगतायत. आता पवारांनी नेहमीप्रमाणे शब्द फिरवला असून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा केला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.