‘उद्धवजी माझ्या कानात म्हणाले मुंबईला या, आपण बसू’

raosaheb danave vs uddhav thackeray

औरंगाबाद : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले. यासोबतच, येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात खेळीमेळीचं वातावरण दिसून आलं. या दोघांमध्ये काही कानगोष्टी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. यावर दानवे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘महाविकास आघाडीत आलबेल नाहीये. मला मुख्यमंत्री कानात असं म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं मला त्रास द्यायला लागले तर भाजपच्या कोणत्या तरी नेत्याला मी बोलवून घेईन. यासोबतच त्यांनी या कधी मुंबईत, बसू, बोलू असं निमंत्रण त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच दिलं. त्यामुळे पूर्वमित्रचे आम्ही पुन्हा मित्र होऊ शकतो,’ असं महत्वाचं विधान रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या